मालवणसह १० गावांची ग्रामदेवता श्री देव गिरोबाचा २६ नोव्हेंबरला नांदरुख येथे भव्य जत्रोत्सव; फटाक्यांची आतषबाजी ठरणार आकर्षण

0
10
मालवणसह १० गावांची ग्रामदेवता श्री देव गिरोबाचा २६ नोव्हेंबरला नांदरुख येथे भव्य जत्रोत्सव
मालवणसह १० गावांची ग्रामदेवता श्री देव गिरोबाचा २६ नोव्हेंबरला नांदरुख येथे भव्य जत्रोत्सव

मालवणसह १० गावांची ग्रामदेवता श्री देव गिरोबाचा २६ नोव्हेंबरला नांदरुख येथे भव्य जत्रोत्सव; फटाक्यांची आतषबाजी ठरणार आकर्षण

कणकवली:
 मालवण शहरासह दहा गावांची मूळ ग्रामदेवता असलेल्या नांदरुख येथील श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. जिल्ह्यात फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या या जत्रोत्सवाची भाविकांना उत्सुकता लागली आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी गिरोबाच्या मंदिर परिसरात मजुरांसाठी बाजारपेठ वसविली होती, अशी ऐतिहासिक माहिती सांगितली जाते. मंदिराच्या उजव्या बाजूला बारमाही पाण्याचे तळे असून, घोड्यांची तहान भागविण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मंदिराच्या मागील बाजूस तलाव खोदण्यात आला होता.
पूर्वीच्या नांदरुख गावाच्या हद्दीत मालवण शहरासह देवबाग, तारकर्ली, वायरी, कुंभारमाठ, घुमडे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ आणि कातवण या गावांचा समावेश होता. त्यामुळे या दहा गावांतील भाविक श्री देव गिरोबाच्या जत्रोत्सवाला आवर्जून उपस्थित राहून दर्शन घेतात. देवबाग, तारकर्ली आदी गावांतील मूळ रापणकर संघ आजही नांदरुखच्या साळकुंभा चाळ्याला मासेमारी व्यवसायात भरभराट मिळावी, या श्रद्धेने कोंबडे व बकरे भक्ष्य म्हणून अर्पण करतात. ही परंपरा आजही जपली जात आहे.
जत्रोत्सवाच्या रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास श्रींची पालखी वाजतगाजत मंदिरात दाखल होते. यावेळी सुमारे अर्धा तास फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी केली जाते. धार्मिक विधी पार पडल्यानंतर माहेरवाशिणींच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर पालखीची प्रदक्षिणा झाल्यावर वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. दहीहंडी फोडून या पारंपरिक जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.
ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक दशावतारी लोककलेचा संगम असलेल्या श्री देव गिरोबाच्या जत्रोत्सवासाठी मालवणसह दहा गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here