मालवण देऊळवाडा येथे दुचाकीला अचानक आग
मोठे नुकसान, चालक बचावला
नालवण (प्रतिनिधी) : शहरातील देऊळवाडा परिसरात टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या घटनेत दुचाकी जळून मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने चालक बचावला आहे.
मालवण देऊळवाडा मार्गावरून जात असताना संबंधित चालक आपल्या TVS Wego दुचाकीवर प्रवास करत होता. यावेळी दुचाकीच्या मागील बाजूस अचानक आग लागली. मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या ही बाब लक्षात येताच त्याने तत्काळ संबंधित चालकाला सूचना दिली. त्यामुळे चालकाने वेळीच दुचाकी थांबवली.
दरम्यान, आगीने काही क्षणांतच दुचाकीच्या मागील भागाला आणि सीटला विळखा घातला. स्थानिक नागरिकांनी माती आणि पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीच्या मागील बाजूस असलेल्या पेट्रोल टाकीला आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.


