‘मुंबईचा राजा’ गणेशगल्लीला सोशल मीडियावर जगभरातून प्रचंड प्रतिसाद
‘मुंबईचा राजा’ गणेशगल्लीला सोशल मीडियावर जगभरातून प्रचंड प्रतिसाद
८ कोटी ४१ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले ऑनलाइन दर्शन
मुंबई :
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीच्या ९९व्या वर्षातील गणेशोत्सवाला सोशल मीडियावर जगभरातील भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या उत्सव कालावधीत तब्बल ८ कोटी ४१ लाखांहून अधिक (८,४१,००,२३४) भाविकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘मुंबईचा राजा’चे ऑनलाइन दर्शन घेतल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.
मंडळाच्या प्रसारमाध्यम समितीने उत्सवाच्या काळात सोशल मीडिया आणि ऑनलाइन दर्शनाच्या माध्यमातून गणेशभक्तांपर्यंत बाप्पाचे दर्शन पोहोचविण्यासाठी नियोजन केले होते. या प्रयत्नांना देश-विदेशातील भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे मंडळाने सांगितले.
गणेशगल्लीच्या ‘मुंबईचा राजा’च्या ऑनलाइन दर्शनाचा हा विक्रमी प्रतिसाद गणेशभक्तांच्या श्रद्धेचे आणि उत्सवाशी जोडलेल्या डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावाचे दर्शन घडवणारा ठरला आहे. मंडळाने भाविकांचे प्रेम, श्रद्धा आणि आशीर्वाद याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
“आपल्या सर्वांच्या या अथांग प्रेम आणि भक्तीबद्दल आम्ही शतशः ऋणी व आभारी आहोत. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहो,” असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.