मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची आपल्या राजापूर गावी भेट
मुंबई :
मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांनी नुकतीच राजापूर (Rajapur) येथील आपल्या गावी भेट देत धावपळीच्या दिनचर्येतून काही क्षण विश्रांतीचा आनंद घेतला.
समाजकारण आणि राजकारणाच्या सततच्या व्यस्ततेमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. जनसामान्यांचे प्रश्न, बैठका आणि विकासकामांच्या धावपळीत मन आणि शरीर दोन्ही गुंतलेले असताना गावातील शांत, निसर्गरम्य वातावरणाने त्यांना नवचैतन्य दिल्याचे त्यांनी सांगितले.
गावात झोपाळ्यावर बसून थंड हवेच्या झुळुकीत घालवलेले निवांत क्षण आणि अनेक दिवसांनंतर लागलेली शांत झोप यामुळे मनावरील ताण हलका झाल्याचे त्यांनी नमूद केले. शहराच्या गजबजाटापासून दूर मिळालेली ही विश्रांती संस्मरणीय ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या विश्रांतीनंतर आता नव्या उत्साहाने आणि जोमाने पुन्हा जनतेच्या सेवेसाठी सज्ज असल्याचेही महापौर रितू तावडे यांनी सांगितले.


