मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर
मुंबई :
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना यंदाच्या दीपावली सणानिमित्त प्रत्येकी ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत हे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिली.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार हे महापालिकेचा कणा आहेत. त्यांनी दीपावलीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
या संदर्भात महापौर दालनात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, सभागृह नेते गणेश खणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी, एआयएमआयएमचे गटनेते विजय उबाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या अमरीन अब्रहानी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर उपस्थित होते.
तसेच सहआयुक्त (वित्त) देविदास क्षिरसागर, उपआयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी आणि महानगरपालिका कामगार व कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीचे विविध पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सर्व गटनेते, पदाधिकारी, महानगरपालिका प्रशासन आणि कामगार-कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने एकमताने ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना दिवाळीच्या सणासाठी आर्थिक दिलासा मिळणार आहे.