मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून बौधगया दर्शनाची संधी
ज्येष्ठ नागरिकांना आवाहन
रत्नागिरी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत बिहार राज्यातील जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र Bodh Gaya येथे भेट व दर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे. बौद्ध धर्मातील चार प्रमुख पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या बौधगयाची निवड पालकमंत्री उदय सामंत यांनी केली असून, जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या यात्रेसाठी अर्ज प्रक्रिया २० मे २०२६ पर्यंत सुरू राहणार असून यात्रा ३ जून ते ९ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. प्रवास रेल्वेमार्फत होणार असून भोजन, निवास आणि प्रवास खर्चाचा समावेश योजनेत करण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी, वय ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, रत्नागिरी येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


