मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेपाळी शिष्टमंडळासोबत द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेपाळी शिष्टमंडळासोबत द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा
मुंबईतील वर्षा निवासस्थानी नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्यासह शिष्टमंडळाची सदिच्छा भेट
मुंबईतील वर्षा निवासस्थानी नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्यासह शिष्टमंडळाची सदिच्छा भेट
मुंबई, दि. २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी नेपाळचे खासदार संदीप राणा आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. या भेटीत भारत-नेपाळ संबंध अधिक दृढ करण्यासह विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या शिष्टमंडळात नेपाळच्या लुंबिनी प्रांताचे खासदार नीमा गिरी तसेच संविधान सभेचे माजी सदस्य अमर सिंग पुन यांचा समावेश होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाचे स्वागत करताना भारत आणि नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संबंधांचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध, परस्पर विश्वास आणि सहकार्याच्या परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली. व्यापार, पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि विकासात्मक सहकार्याच्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण करण्यावरही भर देण्यात आला.
भारत आणि नेपाळ यांच्यातील घनिष्ठ संबंध हे सामायिक इतिहास, संस्कृती आणि लोकांमधील स्नेहभावनेवर आधारित असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही राष्ट्रांच्या सामायिक प्रगती आणि समृद्धीसाठी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सदैव सकारात्मक भूमिका बजावेल, असे नमूद केले.