मुरुड बीचवर स्टंटबाजीला चाप; दापोली पोलिसांची कडक कारवाई
मुरुड बीचवर दापोली पोलिसांची कडक कारवाई
दापोली प्रतिनिधी
दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकडून सुरू असलेल्या स्टंटबाजी आणि निष्काळजी वाहनचालनाेमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीची गंभीर दखल घेत दापोली पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई सुरू केली आहे. स्थानिक नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी आणि वाढता अपघाताचा धोका लक्षात घेऊन ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
समुद्रकिनाऱ्यावर वाहनांद्वारे बेफिकीरपणे स्टंट करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे अनेक वाहनचालक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, भविष्यात अशा प्रकारांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा कडक इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
वाहनांचा वेग आणि अनियंत्रित प्रवेश रोखण्यासाठी मुरुड समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर लोखंडी बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग नियंत्रित झाला असून, स्टंटबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागांवर प्रभावी मर्यादा आल्या आहेत. या उपाययोजनांमुळे समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षिततेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र दिसत आहे.
पर्यटकांची मोठी गर्दी असणाऱ्या वेळेत, विशेषतः संध्याकाळच्या सुमारास, मुरुड समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांचा कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हे पोलिस कर्मचारी केवळ कायदा-सुव्यवस्था राखणार नाहीत, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाईही करणार आहेत.
दापोली पोलिसांच्या या कडक भूमिकेमुळे मुरुड समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षित आणि शांत वातावरण निर्माण होण्यास मदत झाली असून, या निर्णयाचे पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे. आता पर्यटकांना निसर्गरम्य वातावरणाचा सुरक्षितपणे आनंद घेता येणार आहे.
दरम्यान, पोलिस प्रशासनाने पर्यटकांना आवाहन केले आहे की त्यांनी वाहतूक व सार्वजनिक नियमांचे पालन करावे, समुद्रकिनाऱ्याची शांतता व स्वच्छता जपावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. नियम मोडणाऱ्यांवर पुढेही कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दापोली पोलिसांनी दिला आहे.