मुलींनी तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानासाठी करा; रील्स-लाईक्सच्या आभासी जगात वेळ घालवू नका - महापौर रितू तावडे
मुलींनी तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानासाठी करा; रील्स-लाईक्सच्या आभासी जगात वेळ घालवू नका – महापौर रितू तावडे
मुंबई :
अंजुमन-इ-इस्लाम या १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संस्थेच्या सैफ़ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, भायखळा येथे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी भेट देत ५ हजारांहून अधिक विद्यार्थिनींशी संवाद साधला.
स्थानिक नगरसेवक वकार खान यांच्या आग्रहास्तव आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहताना आपण मुंबईची प्रथम नागरिक म्हणून नव्हे, तर शहरातील प्रत्येक मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणारी एक भगिनी आणि पालक म्हणून येथे आल्याचे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
१९३९ पासून कन्या शिक्षणाची मशाल प्रज्वलित ठेवणाऱ्या या विद्यालयात विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी परिस्थिती कशीही असली तरी आपली विचारसरणी कधीही गरीब असता कामा नये, असा संदेश दिला. एक मुलगी शिकते तेव्हा संपूर्ण पिढी प्रकाशमय होते, असे त्यांनी नमूद केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका ही केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारी संस्था नसून नागरिकांची पालक संस्था आहे, असे सांगत त्यांनी मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये सावित्रीबाई फुले कन्या शिक्षण योजना, मोफत व सवलतीचा बेस्ट प्रवास, डिजिटल क्लासरूम्स, महिला बचत गटांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण तसेच मुलींच्या आरोग्यासाठी सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधक लसीकरण मोहीम यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या डिजिटल युगात रील्स आणि लाईक्सच्या आभासी जगात अनावश्यक वेळ न घालवता तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञान आणि कौशल्यवृद्धीसाठी करावा, असा सल्ला महापौरांनी विद्यार्थिनींना दिला. तसेच माता-पिता आणि कुटुंबीयांनी केलेले त्याग कधीही विसरू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
अंजुमन-इ-इस्लामच्या प्रत्येक चांगल्या उपक्रमात मुंबई महानगरपालिका नेहमीच खंबीरपणे पाठीशी राहील, असा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी संस्थेचे प्रेसिडेंट पद्मश्री डॉ. झहीर काझी, नगरसेवक वकार खान, सर्व विश्वस्त, प्राचार्या आणि शिक्षकांचे आभार मानले. विद्यार्थिनींना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.