‘मोदक–पुरणपोळी महोत्सव’ ठरला महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय
महिला उद्योजिकांना मिळाली हक्काची बाजारपेठ; विशेष मुलांच्या कलागुणांनाही मिळाले व्यासपीठ
पनवेल :
पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शनिवार, २२ ऑगस्ट रोजी विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे आयोजित ‘मोदक व पुरणपोळी महोत्सव–२०२६’ ला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या महोत्सवातून महिला उद्योजिकांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली, तर विशेष मुलांच्या कलागुणांनाही व्यासपीठ मिळाले.

महोत्सवाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या उपमहापौर प्रमिला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममताताई प्रितम म्हात्रे होत्या. यावेळी महापालिकेचे सदस्य तसेच महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या महोत्सवात सुमारे ५० महिला गृहउद्योजिकांनी सहभाग घेत विविध प्रकारचे मोदक, पुरणपोळ्या आणि घरगुती उत्पादनांचे स्टॉल्स उभारले. विशेष म्हणजे, यापूर्वी घराबाहेर पडून स्वतंत्रपणे व्यवसाय न केलेल्या अनेक महिलांनी प्रथमच स्वतःचा स्टॉल लावून व्यवसाय करण्याचा अनुभव घेतला.
ग्राहकांशी थेट संवाद साधणे, आपल्या उत्पादनांची विक्री करणे तसेच भविष्यातील ऑर्डर्स मिळविण्याची संधी या महिलांना मिळाली. त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला मोठी चालना मिळाली. सहभागी महिला उद्योजिकांनी या उपक्रमासाठी पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचे आभार मानले.
महिलांच्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप देऊन त्यांना स्वावलंबनाकडे नेण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगत महिलांनी सभापती ममताताई प्रितम म्हात्रे यांचे विशेष आभार व्यक्त केले.
विशेष मुलांच्या कलागुणांनाही व्यासपीठ
महोत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे विशेष मुलांनी स्वतःच्या कलागुणांतून तयार केलेल्या राख्यांचे विक्री केंद्र. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देतानाच विशेष मुलांच्या कलागुणांना समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आले होते.
उपस्थित महिला, स्टॉलधारक आणि ग्राहकांनी विशेष मुलांनी तयार केलेल्या राख्या खरेदी करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सभापती ममताताई प्रितम म्हात्रे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“महिला व बालकल्याण विभागाच्या ‘महिला’ आणि ‘बालक’ या दोन्ही घटकांना एकाच व्यासपीठावर संधी मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे. गृहिणींच्या कौशल्याला व्यवसायाची जोड मिळावी आणि विशेष मुलांच्या कलागुणांना समाजाकडून प्रोत्साहन मिळावे, यासाठी यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील,” असे ममताताई प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिला उद्योजिकांसाठी उपयुक्त ठरला. या उपक्रमासाठी महिला व बालकल्याण विभाग प्रमुख कविता मोकल तसेच डेएनयुएलएम विभागाच्या व्यवस्थापक विन्या म्हात्रे यांचे सहकार्य लाभले.


