मोरा मच्छीमारांच्या नुकसानभरपाई प्रश्न प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याच्या सूचना – नितेश राणे
मोरा मच्छीमारांच्या नुकसानभरपाई प्रश्न प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याच्या सूचना – नितेश राणे
मुंबई, प्रतिनिधी : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी जेएनपीएच्या (JNPA) चौथ्या बंदर प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या मोरा येथील मच्छीमारांच्या नुकसानभरपाई संदर्भातील प्रलंबित विषयाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मच्छीमारांच्या विविध मागण्या आणि नुकसानभरपाई प्रक्रियेतील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान आमदार महेश बालदी यांनी मांडलेल्या सूचना तसेच स्थानिक मच्छीमारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. प्रभावित मच्छीमारांना न्याय मिळावा आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया गतीमान व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
नितेश राणे यांनी शासन निर्णयानुसार नुकसानभरपाईची प्रक्रिया कोणताही विलंब न करता पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मच्छीमारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत संवेदनशीलतेने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
जेएनपीएच्या चौथ्या बंदर प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या मच्छीमारांना योग्य आणि वेळेत नुकसानभरपाई मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत प्रशासनाने या प्रकरणी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.