रत्नागिरीकरांवर नव्या करांचा बोजा?
रत्नागिरी नगर परिषदेच्या अर्थसंकल्पास सोमवारी होणाऱ्या विशेष सभेत मंजुरी दिली जाणार असून, यामध्ये स्वच्छता, दिवाबत्ती आणि अग्निशमन सेवा करांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा पडण्याची शक्यता आहे.
शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता कर प्रती घर दरमहा ३० रुपये या दराने आकारला जाणार असून, वर्षाला ३६० रुपये मालमत्ता करासोबत भरावे लागणार आहेत. इतर आस्थापनांसाठी वर्गवारीनुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. दुकाने व दवाखान्यांसाठी दरमहा ४५ रुपये, शो-रूम, गोदामे, हॉटेल व उपगृहांसाठी ८० रुपये, राहण्याची व जेवणाची सुविधा असलेल्या हॉटेलसाठी १०० रुपये आकारले जाणार आहेत. ५० खाटांपेक्षा कमी रुग्णालयांना ८० रुपये, तर ५० पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांना १२० रुपये प्रतिमहा स्वच्छता कर भरावा लागणार आहे.
शैक्षणिक, धार्मिक, शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी दरमहा ६० रुपये कर प्रस्तावित आहे. विवाह कार्यालये, मनोरंजन सभागृह व एकपडदा चित्रपटगृहांसाठी ५०० रुपये, तर खरेदी केंद्रे आणि बहुपडदा चित्रपटगृहांसाठी १,००० रुपये प्रतिमहा स्वच्छता कर आकारला जाणार आहे. फेरीवाल्यांनाही ३० रुपये प्रतिमहा कर भरावा लागणार आहे. शासनाच्या सूचनेनुसार या करांमध्ये दर पाच वर्षांनी ५ टक्क्यांची वाढ करण्याचाही प्रस्ताव आहे.
याशिवाय, अग्निशमन सेवा कर मालमत्ता कराच्या २ टक्के आणि दिवाबत्ती कर १ टक्का दराने आकारण्यास मंजुरी घेतली जाणार आहे. सध्या मालमत्ता करातून शिक्षण व वृक्ष कर वसूल केला जातो; त्यात आता या नव्या करांची भर पडणार आहे.
शासनाने पाच वर्षांपूर्वीच या करांबाबत परिपत्रकाद्वारे निर्देश दिले होते. मात्र विविध निवडणुकांमुळे निर्णय लांबणीवर पडला होता. आता विशेष सभेत मंजुरी मिळाल्यास नगर परिषदेच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असली, तरी नागरिकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे.


