रत्नागिरीचे दोन धावपटू कोम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये; आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणचा झेंडा उंचावणार
रत्नागिरीचे दोन धावपटू कोम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये; आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणचा झेंडा उंचावणार
रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध कोम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२६ स्पर्धेत रत्नागिरीचे धावपटू प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांनी सहभाग नोंदवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तब्बल ८५.७७ किलोमीटर अंतराच्या या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत सहभागी होणे हीच मोठी कामगिरी मानली जाते.
जिद्द, चिकाटी, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर या दोन्ही धावपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचे नाव पोहोचवले आहे. गतवर्षीच्या यशस्वी कामगिरीमुळे प्रसाद देवस्थळी यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे, तर अभिजित पड्याळ यांचा हा पहिलाच कोम्रेड्स अनुभव अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरणार आहे.
कोकणाच्या मातीत घडलेल्या या दोन खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर जगातील सर्वात कठीण अल्ट्रा मॅरेथॉनपैकी एक मानल्या जाणाऱ्या स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणवासीयांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक सिंधुदुर्ग समाचार परिवारातर्फे प्रसाद देवस्थळी आणि अभिजित पड्याळ यांना कोम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन २०२६ साठी मनःपूर्वक शुभेच्छा!