रत्नागिरीत जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती उपक्रम; उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान

0
8
रत्नागिरीत जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती उपक्रम; उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान
रत्नागिरीत जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती उपक्रम; उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरीत जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती उपक्रम; उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान

रत्नागिरी : दरवर्षी २५ एप्रिल रोजी साजरा होणाऱ्या World Malaria Day निमित्त यावर्षी “हिवताप दुरीकरणासाठी कटीबद्ध : आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे” या घोषवाक्याखाली जिल्हा हिवताप कार्यालय, रत्नागिरी यांच्या वतीने विविध जनजागृतीपर, प्रतिबंधात्मक व गौरवपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कदम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी हिवताप जनजागृती गीत सादर केले तसेच “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या अभियानावर विशेष सादरीकरण करण्यात आले. याशिवाय अधिकारी, कर्मचारी व परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सहभागातून जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली.

यावेळी किटकजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार (सन २०२५–२६) देऊन गौरविण्यात आले. विविध विभागांतील आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा अधिकारी, आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेवक, आस्थापना कर्मचारी, वर्ग ४ कर्मचारी, क्षेत्र कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला.

हिवतापासह Dengue व इतर डासजन्य आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता जिल्ह्यात दैनंदिन सर्वेक्षण, ताप रुग्ण शोध मोहीम, किटकशास्त्रीय तपासणी, पाणीसाठ्यांची पाहणी, अळी नियंत्रण आणि मान्सूनपूर्व तयारीवर विशेष भर देण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागात किटकनाशक फवारणी, धुरफवारणी, “कोरडा दिवस” पाळण्याचे आवाहन आणि आरोग्य शिक्षणाद्वारे व्यापक जनजागृती केली जात आहे.

या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दोन वर्षांत Malaria व डेंग्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली.

नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एकदा “कोरडा दिवस” पाळावा आणि तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here