रत्नागिरीत बोगस औषधांविरुद्ध कारवाईला गती – औषधांची गुणवत्ता जागेवर तपासली जाणार
रत्नागिरी : जिल्ह्यात बोगस आणि कालबाह्य औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध निरीक्षकांनी कारवाईला गती दिली आहे. कारवाईदरम्यान जप्त केलेल्या औषधांची गुणवत्ता जागेवरच तपासून तत्काळ निकाल मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे बोगस तसेच कालबाह्य औषधी विक्री करणाऱ्यांना तत्काळ थांबवता येणार आहे.
मुंबईसह राज्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये बनावट व भेसळयुक्त औषधींच्या तक्रारींची दखल राज्य शासनाने घेतली आहे. तथापि, राज्यात औषध निरीक्षकांची तब्बल 78 टक्के पदे रिक्त आहेत, ज्यामुळे प्रभावी देखरेख करणं आव्हानात्मक ठरत आहे.
जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत औषध निरीक्षकांची संख्या कमी असून, जिथे दहा ते 15 निरीक्षकांची गरज आहे, तिथे केवळ दोन निरीक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विशेषत: औषधांच्या गुणवत्तेवर जागेवरच तपासणी होणार असल्यामुळे रुग्णांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मोठा पाठिंबा मिळणार आहे.


