रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ‘वायुवेग पथका’ची धडक कारवाई
रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ‘वायुवेग पथका’ची धडक कारवाई
रत्नागिरी-
रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतुकीत शिस्त निर्माण करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वायुवेग पथकाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत एकूण ५,८१४ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ३ कोटी ३३ लाख ४३ हजार रुपयांचा दंड आणि १८.४४ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.
आधुनिक यंत्रणेने सुसज्ज ‘इंटरसेप्टर’ वाहने तैनात
सद्यस्थितीत रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामध्ये ५ सर्वसाधारण इंटरसेप्टर वाहने आणि १ अत्याधुनिक रडार यंत्रणेने सुसज्ज असे इंटरसेप्टर वाहन कार्यरत आहे. ही वाहने स्पीडगन, ब्रेथ अॅनालायझर (मद्यप्राशन तपासणी यंत्र) व इतर आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, त्यांच्या माध्यमातून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर थेट व अचूक कारवाई केली जात आहे.
या संपूर्ण मोहिमेत सर्वाधिक दंडवसुली ही नियमबाह्य माल वाहतूक करणारे ट्रक, टिप्पर आणि ट्रेलर इत्यादी वाहनांकडून करण्यात आली आहे. नियमापेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या (ओव्हरलोड) ३५५ वाहनांवर कारवाई करून पथकाने १ कोटी १३ लक्ष ५९ हजार रुपयांचा घसघशीत दंड वसूल केला आहे.
या कारवाईत ओव्हरलोड वाहनांवर सर्वाधिक दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमांपेक्षा अधिक माल वाहतूक करणाऱ्या ३५५ वाहनांकडून तब्बल १ कोटी १३ लाख ५९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तसेच अवैध प्रवासी वाहतूक, रिक्षा आणि स्कूलबस चालकांवरही कारवाई करण्यात आली. ४२५ प्रवासी बस, ७२ खासगी वाहने, ७७ रिक्षा आणि ५५ स्कूलबसवर नियमभंग प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालक (१,४३०), ओव्हरस्पीड वाहने (१,३२२), PUC नसलेली वाहने (१,२८०), फिटनेस प्रमाणपत्र संपलेली वाहने (१,१७६) आणि विमा नसलेली वाहने (१,०९७) यांचा मोठा समावेश आहे.
विस्कळीतपणा / नियमांचे उल्लंघन कारवाई झालेली वाहने ::
रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध करण्यासाठी ही मोहीम पुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे RTO प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाहनधारकांनी सर्व आवश्यक कागदपत्रे बाळगून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.