रत्नागिरी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून भाजपमध्ये नाराजी

0
111
जि. प. – पं. स. निवडणुकांसाठी महायुती सक्रिय; जागावाटपाचा तिढा कायम
जि. प. – पं. स. निवडणुकांसाठी महायुती सक्रिय; जागावाटपाचा तिढा कायम

रत्नागिरी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून भाजपमध्ये नाराजी

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जागावाटपाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पाली येथील निवासस्थानी आढावा बैठक घेतली. या बैठकीत महायुतीतील जागावाटप जवळपास अंतिम झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी असलेल्या दहा गटांपैकी सर्व गट शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून भाजपाला एकही जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीतही भाजपाला जिल्हा परिषदेत खाते उघडता आले नव्हते आणि यंदाही परिस्थिती तशीच राहणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र भाजपाला दोन गण देण्यावर महायुतीत सहमती झाल्याची चर्चा आहे. हरचिरी आणि वाटद हे दोन गण भाजपासाठी सोडण्याची तयारी शिवसेनेने दर्शविल्याचे सांगितले जात आहे. तसेच जिल्हा परिषदेत भाजपाच्या इच्छुकांना स्वीकृत सदस्यपद देण्याबाबतही सहमती दर्शवण्यात आल्याचे समजते. मात्र या भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांचे समाधान न होता नाराजीच अधिक वाढली आहे.

दरम्यान, तालुक्यातील मिरजोळे गटात गावडे, करबुडे गटात बाबू म्हा नाचत व प्रकाश रसाळ, कर्ता गटात महेंद्र झापडेकर, पावस येथे ॲड. महेंद्र मांडवकर, शिरगावमध्ये मोरे तर गोळप गटात नंदा मुरकर यांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. मात्र कोतवडे, वाटद आणि हातखंबा गटांमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम असून अनेक इच्छुक रिंगणात आहेत.

इच्छुकांनी आपसात एक नाव निश्चित करावे, अन्यथा मी जे नाव सांगेन त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्याचे समजते. या बैठकीला राजू महाडिक यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here