रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेत जलस्रोत, शाळा दुरुस्ती आणि वीज यंत्रणा सक्षमीकरणाला प्राधान्य

0
13
रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेत जलस्रोत, शाळा दुरुस्ती आणि वीज यंत्रणा सक्षमीकरणाला प्राधान्य
रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेत जलस्रोत, शाळा दुरुस्ती आणि वीज यंत्रणा सक्षमीकरणाला प्राधान्य

रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेत जलस्रोत, शाळा दुरुस्ती आणि वीज यंत्रणा सक्षमीकरणाला प्राधान्य

भूजल पातळी वाढविण्यासाठी ४३ गावांत सिमेंट नालाबांध व नाला खोलीकरणाचे प्रस्ताव द्या; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यातील जलस्रोत बळकट करून भूजल पातळी वाढविण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने सुचविलेल्या ४३ गावांमध्ये सिमेंट नालाबांध उभारणे तसेच आवश्यक ठिकाणी नाला खोलीकरणाची कामे हाती घेण्यात यावीत. यासाठी जल व मृदसंधारण विभागाने तातडीने सर्वेक्षण करून सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, वीज वितरण आणि पोलीस दलासाठी आवश्यक सुविधांबाबत विविध विभागांना सूचना देण्यात आल्या.
या बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, जल व मृदसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे तसेच उपविभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी यादव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे योजनांची माहिती दिली.
शाळा, अंगणवाड्या आणि रुग्णालयांच्या दुरुस्तीला प्राधान्य
नागरिकांच्या थेट हिताशी संबंधित आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शासकीय, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल-दुरुस्तीचे प्रस्ताव आरोग्य विभागाने तातडीने सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद शाळा, शासकीय निवासी शाळा, आश्रमशाळा, अंगणवाड्या, आयटीआय आणि शासकीय महाविद्यालयांच्या दुरुस्तीची कामेही प्राधान्याने हाती घ्यावीत. संबंधित विभागांनी येत्या १५ दिवसांत ही कामे प्रस्तावाच्या टप्प्यावर अंतिम करून आवश्यक प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश देण्यात आले.
डोंगरावरील गवताचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर
जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी जमिनींवर, विशेषतः डोंगराळ भागांत मोठ्या प्रमाणात उगवणाऱ्या गवताचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी व्हावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाने वनविभागाच्या समन्वयाने ठोस नियोजन करावे. तसेच वैरण विकास योजनेचे प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
वीज वितरण यंत्रणा बळकट करण्यावर भर
ग्रामीण भागातील विद्युतीकरण, सौर ऊर्जा प्रकल्प आणि स्मशानभूमी दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देशही देण्यात आले. वीजपुरवठ्यातील ओव्हरलोडिंग आणि तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी महावितरणने नवीन वितरण रोहित्रे (डीपी) खरेदी करावीत. कृषी वाहिनीवरील घरगुती ग्राहकांसाठी गरजेनुसार विशेष रचनेची रोहित्रे बसवून वीज वितरण यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
रत्नागिरी पोलिसांसाठी ‘डॉग व्हॅन’चा प्रस्ताव
पुण्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी सुसज्ज ‘डॉग व्हॅन’ तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विविध विभागांच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून नागरिकांना चांगल्या सेवा उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here