रत्नागिरी जिल्ह्यातील 'विशेष कार्यकारी अधिकारी' पदे रद्द
रत्नागिरी जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदे रद्द; महिन्याभरात नवीन नियुक्त्या होणार
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय; विद्यमान अधिकाऱ्यांना शिक्के जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. ५ जुलै : रत्नागिरी जिल्ह्यातील सध्या कार्यरत असलेली विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) पदे रद्द करून येत्या महिन्याभरात नव्याने नियुक्त्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील विद्यमान विशेष कार्यकारी अधिकारी पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पुढील महिन्याभरात नव्या नियुक्त्यांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
या निर्णयानंतर सध्या कार्यरत असलेल्या सर्व विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील अधिकृत शिक्के तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, राजापूर प्रांताधिकारी विश्वजीत गाताडे, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, राजापूर तहसीलदार विकास गंबरे, लांजा तहसीलदार प्रियांका ढोळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.