रत्नागिरी नगरपालिकेत उपनगराध्यक्ष–अभियंत्यात खडाजंगी
पारदर्शक कारभाराच्या मागणीवरून वाद
रत्नागिरी नगरपरिषदेच्या आवारात गुरुवारी सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली. २०२१ मधील स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या कामांच्या खर्चाचा तपशील आणि निविदा कागदपत्रांची मागणी केल्यावरून हा वाद उफाळून आला असून, अभियंता जाधव यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप उपनगराध्यक्ष तिवरेकर यांनी केला आहे. या घटनेमुळे नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास पालिका कार्यालयात गेले होते. २०२१ स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या खर्चाबाबत निविदेनुसार कामांचा तपशील आवश्यक असल्याने त्यांनी अभियंता रोहन डांगे यांच्याकडे संबंधित कागदपत्रांची मागणी केली. आगामी सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करायची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याच दरम्यान, तेथून बाहेर पडणारे बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांनी अचानक हस्तक्षेप करत उपनगराध्यक्ष तिवरेकर यांना उद्देशून शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना तिवरेकर यांनी सांगितले की, “मी जाधव यांच्याशी बोलतही नव्हतो, तरी त्यांनी पूर्वग्रहदूषितपणातून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत धमकावले. नगरपालिकेत पारदर्शक कारभार व्हावा आणि कामांतील त्रुटी समोर याव्यात यासाठी मी प्रयत्न करत आहे. मात्र, ज्यांनी गैरप्रकार केले असतील त्यांच्या मनात भीती असल्यानेच असा प्रकार घडला असावा. रत्नागिरीच्या संस्कृतीला हे वर्तन शोभणारे नाही.”
या घटनेच्या वेळी पालिकेचा कर्मचारी वर्ग, शिवसेनेचे गटनेते बाळू साळवी, पाणी सभापती निमेश नायर तसेच अन्य नगरसेवक उपस्थित होते. उपनगराध्यक्षांशी झालेल्या या कथित गैरवर्तणुकीमुळे सत्ताधारी पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, येत्या ३० तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडून कडक कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे संकेत उपनगराध्यक्ष तिवरेकर यांनी दिले आहेत. या प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.


