रत्नागिरी रेल्वे स्थानकात मोफत ड्रॉप अँड गो सुविधा; युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

0
10
रत्नागिरी रेल्वे स्थानकात मोफत ड्रॉप अँड गो सुविधा; युवासेनेच्या पाठपुराव्याला यश
रत्नागिरी रेल्वे स्थानकात मोफत ड्रॉप अँड गो सुविधा; युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी रेल्वे स्थानकात मोफत ड्रॉप अँड गो सुविधा; युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

पार्किंग शुल्काच्या मनमानी वसुलीला आळा

रत्नागिरी :
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील पार्किंग शुल्काच्या मनमानी वसुलीविरोधात युवासेनेने पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. युवासेना जिल्हा युवाधिकारी (माजी) प्रसाद सुरेश सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे रत्नागिरी येथील क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश दा. बापट यांनी प्रसाद सावंत यांना पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली आहे. त्यानुसार, रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांसाठी मोफत ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांकडून पार्किंग शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पार्किंग शुल्काच्या मनमानी वसुलीबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित ठेकेदाराला सक्त ताकीद देण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारू नये आणि सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. तसेच, पार्किंग शुल्काचे अधिकृत दरफलक स्थानक परिसरात लावणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यावर नमूद केलेल्या दरांनुसारच शुल्क आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमभंग आढळल्यास देखरेख ठेवून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही रेल्वे प्रशासनाने पत्रात नमूद केले आहे.
प्रवाशांच्या हक्कांसाठी युवासेनेने या प्रश्नावर आवाज उठवला होता. प्रसाद सावंत यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने तक्रारींची दखल घेत आवश्यक कार्यवाही केल्याचे कळविले आहे. उपस्थित केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आल्याने जनआंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतीही रेल्वे प्रशासनाने केली आहे.
युवासेनेच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, पार्किंग ठेकेदाराकडून अधिकृत दरांनुसारच शुल्क आकारले जाते का आणि मोफत ‘ड्रॉप अँड गो’ सुविधेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का, यावर प्रवाशांचे लक्ष राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here