रत्नागिरी विमानतळाच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी, प्रगतीचा आढावा
महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत असलेल्या रत्नागिरी विमानतळाच्या कामाच्या सद्यस्थितीची पाहणी जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.) यांनी केली. या भेटीदरम्यान त्यांनी सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती जाणून घेतली.
पाहणीदरम्यान धावपट्टी, टर्मिनल इमारत, सुरक्षा व्यवस्था तसेच पायाभूत सुविधांच्या कामांची स्थिती तपासण्यात आली. कामे दर्जेदार व नियोजित कालमर्यादेत पूर्ण व्हावीत, यासाठी आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. विमानतळ सुरू झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन, व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाच्या कामात येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवून कामाला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी दिले.
रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोकणातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.


