रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी अंतर्गत बँकिंग मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी अंतर्गत बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. या केंद्राचे विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
उद्घाटनप्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रशिक्षण संस्थेच्या व्यवस्थापक मा. मिताली झा व चलन इशू विभागाचे व्यवस्थापक मा. दयाराम चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. गणेश जाधव, बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक प्रा. डॉ. विजय कुंभार, सी. डी. देशमुख अध्यासनाचे चेअर प्रोफेसर प्रा. डॉ. राजशेखर निल्लोलू, वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. टी. डी. महानवर तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
डी. जी. महाविद्यालयात शहरातील नामांकित वाणिज्य महाविद्यालयांच्या तोडीस तोड तसेच काही बाबतीत अधिक उत्कृष्ट अशा शैक्षणिक व करिअरपूरक सुविधा उपलब्ध असल्याचे मा. मिताली झा यांनी नमूद केले. बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, स्टॉक मार्केट लॅबोरेटरी, सी. डी. देशमुख मॉडेल बँक, उद्योजकता विकास केंद्र अशा उपयुक्त सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले व रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
महाविद्यालयात केवळ बी.कॉम. व एम.कॉम.पुरते शिक्षण मर्यादित नसून बी.कॉम. अकाउंटन्सी, बँक मॅनेजमेंट, बिझनेस स्टडीज, बँकिंग अँड फायनान्स, बिझनेस अॅनॅलिटिक्स, फायनान्शियल मार्केट्स, एव्हिएशन मॅनेजमेंट, बी.सी.ए., बी.कॉम. आय.टी. तसेच विविध एम.कॉम. अभ्यासक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

देशातील बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध असून ग्रामीण भागातील तरुणांनी बँकिंग स्पर्धा परीक्षांकडे गांभीर्याने वळावे, असे आवाहन मा. दयाराम चौधरी यांनी केले. बँकिंग क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी डी. जी. महाविद्यालयातील हे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी असल्याचे मत मा. मिताली झा यांनी व्यक्त केले.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रा. डॉ. गणेश जाधव यांनी सांगितले. तर देशातील प्रत्येक बँकिंग संस्थेत रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी कार्यरत असावा या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आले असून नाममात्र शुल्कात दर्जेदार मार्गदर्शन दिले जात असल्याचे प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र विभागातील सहाय्यक विभागप्रमुख सौ. प्रियांका हिंदळेकर, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक सौ.भावना मुणगेकर, हर्षदा महाजन व विरेश चव्हाण तसेच गणपत परब, मनाली सारंग आणि स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले.


