Pensioners Life Certificate 2026 : निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा; १ नोव्हेंबरपासून डिजिटल मोहीम

0
8
राज्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! नोव्हेंबरमध्ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मोहीम
राज्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासा! नोव्हेंबरमध्ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मोहीम

Pensioners Life Certificate 2026 : निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा; १ नोव्हेंबरपासून डिजिटल मोहीम

घरबसल्या मोबाईलवरून सादर करता येणार हयातीचा दाखला

 निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी सादर करावा लागणारा हयातीचा दाखला आता ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मोबाईलवरून सादर करता येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान देशव्यापी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट मोहीम राबविण्यात येणार असून, राज्यातील निवृत्तीवेतनधारकांनाही याचा लाभ घेता येणार आहे.
मुंबई :
राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील वर्षाचे निवृत्तीवेतन सुरळीत सुरू राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सादर करावा लागणारा हयातीचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) आता अधिक सुलभ पद्धतीने सादर करता येणार आहे. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागाच्या वतीने १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत देशभरातील २ हजार शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पाचवी देशव्यापी ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ (DLC) मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे येथील अधिदान व लेखा कार्यालयात पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. ही आतापर्यंतची सर्वात मोठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम मानली जात आहे. केंद्र सरकारच्या ‘जीवन प्रमाण’ ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांना बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज न पडता मोबाईलवरून घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
या देशव्यापी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांनी मुंबईतील अधिदान व लेखा कार्यालयाला भेट दिली. यावेळी संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोहिमेच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
भेटीदरम्यान दीपक गुप्ता यांनी कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखा आणि पेन्शन मदत कक्षाची पाहणी केली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांना ‘जीवन प्रमाण’ प्रणाली आणि फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत डिजिटल जीवन प्रमाणपत्र कसे तयार करता येते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
रांगेत उभे राहण्याची गरज नाही!
हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँक किंवा संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे यांनी केले आहे. राज्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन ‘जीवन प्रमाण’ पोर्टलद्वारे वेळेत हयातीचा दाखला सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here