राज्यात १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष शालेय स्वच्छता मोहीम; ‘माझी शाळा-माझी जबाबदारी’ उपक्रमाला चालना
राज्यात १८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान विशेष शालेय स्वच्छता मोहीम; ‘माझी शाळा-माझी जबाबदारी’ उपक्रमाला चालना
मुंबई :
राज्यातील सर्व शाळांमध्ये १८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘चला शाळेत जाऊ या… विशेष शालेय स्वच्छता मोहीम’ राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने १६ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. या मोहिमेतून शाळांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि देखभाल करून विद्यार्थ्यांसाठी अधिक पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
शाळा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आनंददायी ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि शिस्तीची भावना रुजविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
‘माझी शाळा-माझी जबाबदारी’ या भावनेतून सहभाग
या मोहिमेत शाळा व्यवस्थापन समित्या, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, तसेच उपलब्धतेनुसार कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत कार्यरत संस्था आणि स्थानिक सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. मोहिमेची शाळास्तरीय अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आली आहे.
समग्र शिक्षा योजनेंतर्गत शाळांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांना या मोहिमेमुळे चालना मिळणार आहे. सामूहिक सहभागातून शाळांचा परिसर अधिक स्वच्छ आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित बनविण्याबरोबरच शाळेविषयी आपलेपणा व जबाबदारीची भावना दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे.