रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया उपलब्ध
रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया उपलब्ध
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते बचाव उपकरणांचे वितरण; अलिबाग किनाऱ्यावर जीवरक्षकांना प्रशिक्षण
अलिबाग प्रतिनिधी :
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया ही आधुनिक बचाव उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपकरणांचे वितरण पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.
या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्यासह संबंधित नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संकटात सापडलेल्या पर्यटकांना तातडीने मदत
समुद्रात बुडण्याचा धोका निर्माण झालेल्या किंवा पाण्यात अडचणीत सापडलेल्या पर्यटकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यासाठी रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया हे उपकरण उपयुक्त ठरते. रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हे उपकरण पाण्यातील संकटग्रस्त व्यक्तीपर्यंत पोहोचविता येते. त्यामुळे बचावकार्य अधिक जलद करण्यासोबतच जीवरक्षकांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
समुद्रकिनाऱ्यांवरील बचाव यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही उपकरणे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आली आहेत.
सात ठिकाणच्या स्थानिक संस्थांना उपकरणांचे वाटप
अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन नगरपरिषदा तसेच नागाव, काशीद, हरिहरेश्वर आणि दिवेआगर येथील ग्रामपंचायतींना या बचाव उपकरणांचे वितरण करण्यात आले. काशीद येथे दोन उपकरणे देण्यात आली आहेत.
अलिबाग समुद्रकिनारी प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण
उपकरणांच्या वितरणानंतर अलिबाग समुद्रकिनारी जीवरक्षकांसाठी रिमोट ऑपरेटेड लाईफ बोया वापरण्याचे प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यामध्ये उपकरणाचे संचालन, समुद्रातील संकटग्रस्त व्यक्तीपर्यंत ते पोहोचविण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष बचावकार्यादरम्यान त्याचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक बचाव उपकरणे, प्रशिक्षित जीवरक्षक आणि प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.