
रायगड जिल्हा परिषदेत ‘मुंढे’ पॅटर्न; बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी १६४ कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात
रायगड : रायगड जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याच्या संशयावरून मोठी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोहीम हाती घेतली असून जिल्हा परिषदेतील १६४ कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तसेच त्यांच्या UDID (युनिक डिसॅबिलिटी आयडी) कार्डांची पुन्हा सखोल पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक चौकशीत जर प्रमाणपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात येणार असून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. याशिवाय त्यांनी घेतलेला पगारही वसूल करण्याची प्रक्रिया राबवली जाऊ शकते. काही प्रकरणांमध्ये पुनः वैद्यकीय तपासणी करण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात असून तब्बल २८ जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातही २०० हून अधिक कर्मचाऱ्यांबाबत संशय व्यक्त करण्यात आला असून सोलापूर, नाशिकसह इतर जिल्ह्यांतही या संदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे. खऱ्या दिव्यांगांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

