रेल्वे प्रवासी अडकले, एसटी धावली मदतीला! चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांचे कौतुक
रेल्वे प्रवासी अडकले, एसटी धावली मदतीला! चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांचे कौतुक
मुंबई :
मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक दोन दिवसांपूर्वी रात्री ९ वाजल्यापासून विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडले होते. रात्रीची वेळ आणि प्रवासासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने विशेषतः महिला प्रवासी आणि महाविद्यालयीन तरुणी चिंतेत होत्या.
अशा अडचणीच्या परिस्थितीत कसारा येथे थांबलेली एसटी बस प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर पोहोचली. एसटीचे चालक किरण खांडवी आणि वाहक राकेश पत्की यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली. त्यांच्या तत्परतेमुळे अडचणीत सापडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
या घटनेची दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी चालक किरण खांडवी, वाहक राकेश पत्की तसेच संबंधित एसटी प्रशासनाचे अभिनंदन केले.
एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतुकीची सेवा नसून, अडचणीच्या प्रसंगी सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाणारी विश्वासाची यंत्रणा आहे. प्रवाशांच्या अडचणीचे गांभीर्य ओळखून तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाची सेवाभावी परंपरा अधिक दृढ होत आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नमूद केले.