रेवदंडा–साळाव पुलावरून २० टनांवरील अवजड वाहनांना बंदी - जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश
रेवदंडा–साळाव पुलावरून २० टनांवरील अवजड वाहनांना बंदी – जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश
अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा–साळाव पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी करत २० टनांवरील अवजड वाहनांच्या वाहतुकीस पुढील आदेशापर्यंत दिवसा व रात्री पूर्णपणे बंदी घातली आहे.
पुलावरील भार कमी ठेवून त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.
मात्र, दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला आणि पिण्याच्या पाण्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.
प्रशासनाने पुलावरून वाहतूक करताना खालील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:
कमाल वेगमर्यादा ३० किमी प्रतितास ठेवावी.
दोन वाहनांमध्ये किमान २० मीटरचे अंतर राखावे.
पुलावर वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
तसेच २० टनांवरील अवजड वाहनांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुलाच्या सुरक्षिततेसाठी नागरिक, वाहनचालक आणि वाहतूकदारांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.