लोकप्रतिनिधींच्या दणक्यानंतर वैभववाडीत साईट पट्टीच्या कामांना सुरुवात
वैभववाडी : तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अखेर खडबडून जागे झाले असून वैभववाडी शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या साईट पट्टीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असले तरी अनेक ठिकाणी कामे अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना चांगलेच धारेवर धरले.
या बैठकीला सभापती सिद्धेश रावराणे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, नगरसेवक रणजीत तावडे, आशिष रावराणे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील एडगाव, कोकिसरे, नाधवडे आणि करूळ येथील महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत तातडीने कामे पूर्ण करण्याची मागणी केली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंता वृषाली पाटील यांनी संबंधित जोड रस्त्यांचे अंदाजपत्रक तयार करून ही कामे लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या दबावानंतर शुक्रवारी वैभववाडी शहरातील साईट पट्टीच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.


