लोकमत समूहाच्या वतीने आयोजित ‘सरपंच पुरस्कार’ सोहळा

0
51
लोकमत समूहाच्या वतीने आयोजित 'सरपंच पुरस्कार' सोहळा
लोकमत समूहाच्या वतीने आयोजित 'सरपंच पुरस्कार' सोहळा

लोकमत समूहाचा ‘सरपंच पुरस्कार’ सोहळा उत्साहात

ग्रामीण विकासात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांचा गौरव

मुंबई, दि. ३ : लोकमत समूहाच्या वतीने आयोजित ‘सरपंच पुरस्कार’ सोहळा उत्साहात पार पडला. ग्रामीण विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यभरातील सरपंचांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण नेतृत्वाच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंचांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी लोकमत समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्यसैनिक तथा ज्येष्ठ पत्रकार स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या लोकशाही मूल्यांवरील विचारांचा तसेच महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी बळकट केलेल्या पंचायत राज व्यवस्थेचा गौरव केला. ग्रामविकासात सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, गावाच्या प्रगतीचे नेतृत्व त्यांच्या हातात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी काटेवाडीच्या ग्रामविकासाचा अनुभवही उपस्थितांसमोर मांडण्यात आला. संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानापासून सुरू झालेल्या विकासप्रवासात ग्रामस्वच्छता, कचरामुक्त व हागणदारीमुक्त गाव, जलसंधारण, वृक्षारोपण, सौरऊर्जा, ठिबक सिंचन, आधुनिक शेती, सायबर ग्राम, इको व्हिलेज तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे काटेवाडीची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी घरावर व मालमत्तेच्या कागदपत्रांवर महिलेचे नाव नोंदविण्याचा अभिनव उपक्रम काटेवाडीत राबविण्यात आल्याचा उल्लेख करत, स्त्री-पुरुष समानतेसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
यावेळी सरपंचांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, डिजिटल सुविधा, शिक्षण, आरोग्य, कृषी विकास आणि महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर सतर्क राहून नागरिकांना आवश्यक मदत व सुविधा उपलब्ध करून देण्याचेही आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी पुरस्कारप्राप्त सर्व सरपंचांचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण विकासासाठी त्यांच्या विधायक कार्यात शासन सकारात्मक सहकार्य करेल, तसेच लोकमत समूहाने मांडलेल्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here