वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ

0
22
वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ
वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ उपक्रम

आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरण सेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरण सेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.
राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत.
वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे.
याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक मार्गदर्शन वारकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. निवडक ठिकाणी योगसत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, गतवर्षी ‘चरण सेवा’ उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमातून १ लाख ७५ हजारांहून अधिक वारकऱ्यांना थेट चरण सेवा, वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, तर १० लाखांपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला.
‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित ‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here