२७० हून अधिक निवेदने प्राप्त; नागरिकांच्या समस्या जाणून घेत कार्यवाहीचे आश्वासन
वाशी :
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि मागण्यांसंदर्भात २७० हून अधिक निवेदने प्राप्त झाली.
यावेळी गणेश नाईक यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले. प्रत्येक निवेदनाची दखल घेत संबंधित विषयांवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
जनता दरबाराच्या समारोपावेळी शेवटच्या नागरिकाचीही भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर जनता दरबाराचा समारोप करण्यात आला.
“नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे, त्यांची दखल घेणे आणि त्यांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, हीच जनसेवेची खरी दिशा आहे,” असे गणेश नाईक यांनी सांगितले.