विद्यार्थी गुणवत्तेला प्राथमिकता हवी- गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे
विद्यार्थी गुणवत्तेला प्राथमिकता हवी- गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे
दापोली-
आज एकविसाव्या शतकात समाजातील सर्वच क्षेत्रांमध्ये आमुलाग्र बदल झालेला जाणवत आहे. शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी आज चिकित्सक व ज्ञानार्थी दिसत आहेत. देशात शिक्षण क्षेत्रात अनेक ठिकाणी एआयचा प्रभाव जाणवू लागला आहे. काही शाळांमधून रोबोचा वापरही सुरु झाला आहे. अगदी जवळचे सांगायचे तर आपल्या दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत रोबोने प्रवेश केला आहे. त्यामुळेच यापुढील काळात सर्वच शिक्षकांसमोर नवनवीन आव्हाने निर्माण होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे ठोस उपाययोजना केल्यास विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी पुढे येऊ शकतील व आपल्या गावाचे, तालुक्याचे नाव उज्ज्वल करु शकतील असे स्पष्ट प्रतिपादन दापोली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी तालुक्यातील टाळसुरे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत बोलताना केले.
दापोली तालुक्यातील टाळसुरे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद नुकतीच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आपटी येथे संपन्न झाली. कुंभवे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार यांच्या अध्यक्षतेखालील या शिक्षण परिषदेसाठीच्या व्यासपीठावर टाळसुरे केंद्रप्रमुख संजय मेहता, आपटी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपिका कदम, टाळसुरे केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली भोये, आपटी शाळेचे मुख्याध्यापक सुनील साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिक्षण परिषदेस सदिच्छापर भेट देताना गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेत ज्योती पवार यांनी शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठण या विषयावर तर दिपाली धायगुडे यांनी निपुण भारत आढावा या विषयावर मार्गदर्शन केले. प्रज्ञा देवघरकर यांनी अध्ययन निष्पत्तीवर आधारित मासिक नियोजन या विषयावर चर्चा व कार्यशाळा घेतली तर संजय मेहता यांनी मित्र उपक्रम, समस्या निराकरण, सीआरजी पुनर्गठण, समाजसहभाग तसेच प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन केले. या शिक्षण परिषदेच्या प्रारंभी आपटी शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. संपूर्ण शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन दत्ता शिंदे, सुप्रिया हजारे यांनी केले तर सुनील साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानले.