‘विधी सेवा सदन’चे उद्घाटन; वाद निवारण सुसह्य होणार – न्यायमूर्ती माधव जामदार
जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या ‘विधी सेवा सदन’ या वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते झाले. या केंद्रामुळे योग्य वातावरणात पक्षकारांना आपसातील वाद सामोपचाराने व कायमस्वरूपी पद्धतीने मिटवता येतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिरुद्ध फणसेकर, डॉ. संघमित्रा फुले आदी उपस्थित होते.
न्यायमूर्ती जामदार यांनी सांगितले की, लोकअदालत व वैकल्पिक वाद निवारण केंद्रांमुळे न्यायालयांवरील ताण कमी होऊन जलद व समाधानकारक न्याय मिळतो. प्रभारी न्यायाधीश जाधव यांनी नालसाचे उद्दिष्ट सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांना परवडणारा न्याय देणे असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात वाद निवारण केंद्रामार्फत न्याय मिळालेल्या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. दीपप्रज्ज्वलन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली असून न्यायाधीश, वकील व विधी स्वयंसेवक उपस्थित होते.


