‘विनाअट सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्या; अन्यथा संघर्ष तीव्र करू’ – आमदार रोहित पवार
‘विनाअट सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्या; अन्यथा संघर्ष तीव्र करू’ – आमदार रोहित पवार
पंढरपूर : राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी देण्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. यासंदर्भात पंढरपूरच्या पवित्र भूमीत दिलेले आश्वासन सरकारने अद्याप पूर्ण केले नसल्याने हा राज्यातील अन्नदात्यांचा विश्वासघात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत रोहित पवार म्हणाले की, राज्य सरकारने अनेक चर्चा केल्या; मात्र अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता चर्चा नव्हे तर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे.
पंढरपूरमध्ये दिलेला शब्द सरकारने पाळला नसल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची घोषणा केली. या आंदोलनाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पवित्र नगरी पंढरपूर येथून करण्यात येणार असून श्री विठुरायाचे आशीर्वाद घेऊन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच २९ जून रोजी मराठवाड्यात ‘अन्नदात्याचा एल्गार’ आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारविरोधात राज्यभरातील अन्नदाता एकवटणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
विनाअट सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा संघर्ष सुरू राहील, असा निर्धार यावेळी रोहित पवार यांनी व्यक्त केला.