वेंगुर्ल्यात पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ गाढ झोपला
शहर बेभरवशाच्या भरवशावर
सीसीटीव्ही यंत्रणा ‘तांत्रिक कारण’ सांगून बंद, भुरटे चोर मात्र बिनधास्त
वेंगुर्ला:
‘कायदा-सुव्यवस्थेचा कणा’ म्हणून ओळखली जाणारी वेंगुर्ला शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सध्या गाढ झोपेत आहे. डीपीडीसीच्या लाखो रुपयांच्या निधीतून बसवलेले कॅमेरे ‘तांत्रिक बिघाडा’चे कारण देत बंद पडलेत. आणि गंमत म्हणजे, शहरात भुरट्या चोऱ्या, मारामाऱ्या मात्र बिनबोभाट सुरू आहेत.
सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र तुळसुलकर यांनी याच ‘झोपलेल्या यंत्रणे’ला आरसा दाखवलाय. “वेंगुर्ला हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण. इथे हजारो नागरिकांची रोज वर्दळ. अशा ठिकाणी सीसीटीव्ही बंद असणे म्हणजे चोरांना ‘या, तुमचं स्वागत आहे’ अशी पायघडी घालण्यासारखं आहे,” असा खोचक सवाल तुळसुलकर यांनी प्रशासनाला विचारला आहे.
⭐पालकमंत्र्यांनी गाड्या दिल्या, पण ‘डोळे’ कोणी उघडायचे?
तुळसुलकर पुढे म्हणाले, “पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी सिंधुदुर्ग पोलिसांना अद्ययावत गाड्या दिल्या. त्यांचे मनापासून अभिनंदन. खरोखरच स्तुत्य उपक्रम. साहेबांचा उद्देश साफ आहे – जनता भयमुक्त झोपली पाहिजे, सुरक्षित राहिली पाहिजे. पण गाड्या देऊन उपयोग काय? जर शहरातील सीसीटीव्हीच बंद असतील, चोरटे दिवसाढवळ्या दारू पिऊन धिंगाणा घालत असतील, तरुणांना मारहाण करत असतील, तर या गाड्या फिरवायच्या कुणासाठी?”
“सामान्य माणूस आज हाच प्रश्न विचारतोय – सर्वसामान्य भिकेला लागला तरी चालेल, पण सिंधुदुर्ग पोलिसांची यंत्रणा झोपलेली चालेल का?” असा थेट सवाल तुळसुलकर यांनी उपस्थित केला.
‘तिसरा डोळा’ बंद, गुन्हेगारांचे फावले
पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून सीसीटीव्हीकडे बघितलं जातं. चोरी झाली, भांडण झालं, अपघात झाला – पहिला पुरावा सीसीटीव्हीच देतो. पण वेंगुर्ल्यात तो डोळाच बंद असल्याने तपासात अडथळे येताहेत. “गुन्हा घडल्यावर फुटेज मागायला गेलं की ‘यंत्रणा बंद आहे’ हे उत्तर मिळतं. मग तपास करायचा कसा?” अशी व्यथा एका पोलीस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवली.
प्रशासनाला चार प्रश्न
1. पोलीस निरीक्षक, वेंगुर्ला: साहेब, गाडी नवीन मिळाली, पण कॅमेरे जुने झाले म्हणून बंद ठेवायचे का? दुरुस्तीला किती मुहूर्त लागतो?
2. नगरपरिषद मुख्याधिकारी: शहराच्या सुरक्षेसाठी तुमचाही वाटा आहे. डीपीडीसीचा निधी आला, कॅमेरे लागले, मग मेंटेनन्सचा खर्च कोण करणार?
3. जिल्हा पोलीस अधीक्षक: जिल्ह्याला नवीन गाड्या मिळाल्या, आनंद आहे. पण त्या गाड्या फिरवताना रस्त्यावर काय चाललंय हे टिपणारे कॅमेरे सुरू आहेत का, हे एकदा तपासाल?
4. पालकमंत्री महोदय: आपण दिलेल्या गाड्यांचा योग्य वापर व्हावा, हीच अपेक्षा. पण ‘डोळे’ बंद असताना ‘हात-पाय’ हलवून उपयोग काय? जरा लक्ष द्याल का?
असे थेट सवाल शैलेंद्र तुळसुलकर यांनी प्रशासनाला केले आहेत.
मागणी साधी, अपेक्षा रास्त
शैलेंद्र तुळसुलकर यांची मागणी अगदी रास्त आहे – “कारण काहीही असो, तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करून सीसीटीव्ही यंत्रणा 8 दिवसांत कार्यान्वित करावी.”
कारण वेंगुर्लेकरांना गाड्या नकोत असे नाही, पण त्या गाड्या फिरताना शहर सुरक्षित आहे याची खात्री हवी. चोरट्यांनी धुमाकूळ घातला आणि पुरावाच मिळाला नाही, तर मग ‘स्मार्ट पोलीसिंग’ म्हणायचं कुणाला?
साहेब, गाडी दिलीत, आता डोळे उघडा. वेंगुर्लेकर तुमच्याकडे डोळे लावून बसलेत. झोपेचं सोंग घेणाऱ्या यंत्रणेला जागं करा, हीच विनंती.


