वैभववाडीत अक्षयतृतीये निमित्त ‘राज्यस्तरीय ढोल स्पर्धा’
तिरवडेत भव्य आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी): तिरवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने तिरवडे तर्फ सौदळ (इंडुलकरवाडी) येथील श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात अक्षयतृतीयेच्या निमित्ताने यंदाही भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणारी ‘राज्यस्तरीय ढोल स्पर्धा’ मंगळवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
श्री राधाकृष्ण प्रतिष्ठानतर्फे आयोजित ही स्पर्धा रात्री ८ वाजल्यापासून मंदिर परिसरात रंगणार आहे. मराठी संस्कृतीचे जतन, परंपरागत वाद्यांची परंपरा टिकवणे आणि तरुण पिढीला ढोल-ताशा वादनाशी जोडणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमोद इंडुलकर यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी १०,००१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७,००१ रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५,००१ रुपये तसेच उत्तेजनार्थ २,१०० रुपये अशी बक्षिसांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय उत्कृष्ट ढोलवादक, ताशावादक आणि झांजवादक यांना प्रत्येकी ५०१ रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
प्रत्येक पथकात १० सदस्यांचा समावेश असणार असून त्यामध्ये ६ ढोल, २ ताशे, १ निशाण आणि १ झांज यांचा समावेश असेल. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी १० मिनिटांचा वेळ देण्यात येणार असून वादनातील जोश, लयबद्धता आणि वेशभूषा यांवर आधारित गुणांकन करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून नाव नोंदणीसाठी १००० रुपयांची अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. ही रक्कम स्पर्धा सुरू होण्यापूर्वी परत करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरसह राज्यभरातील ढोल पथकांना सहभागी होण्याचे आवाहन सचिव रेगन इंदुलकर यांनी केले आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२६ आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सुमोद इंदुलकर (७७३८७०२५२२), रेगन इंदुलकर (९०२९६४४५५७), तेजस इंदुलकर (७५८८६०८०६८) आणि मिथिलेश इंदुलकर (८७९९८९९०१०) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच संबंधित क्रमांकावर संपर्क साधून गूगल लिंक भरून आपली नोंदणी निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने पथके सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


