वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ-मालवण मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम
कुडाळ : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस दि. २६ मार्च रोजी साजरा होत असून, त्यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्या माध्यमातून मतदारसंघात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांची सुरुवात दि. २१ मार्च रोजी मांडकुली येथे होणार असून, शिवसेना शाखेच्या वतीने तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दि. २४ मार्च रोजी कणकवली येथे रक्तदान शिबिर होणार आहे.
दि. २५ मार्च रोजी कुडाळ शहरात रिक्षा सेनेच्या चालकांचा एक लाख रुपयांचा विमा उतरविणे आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार असा कार्यक्रम होणार आहे. त्याच दिवशी मालवण येथे नेरूरचा सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच आचरा विभागात ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक व मानकऱ्यांचा सत्कार आणि त्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच दि. २६ मार्च रोजी माणगाव येथे सरबत वाटप, अणाव येथील आनंदाश्रयमध्ये शिधा वाटप, तसेच झाराप येथील जीवदान विशेष शाळेत विद्यार्थ्यांना शिधा व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकीसोबतच सांस्कृतिक परंपरांनाही उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


