व्हॉलीबॉलमध्ये त्रिंबकची विजयी भरारी!

0
12
व्हॉलीबॉलमध्ये त्रिंबकची विजयी भरारी!
व्हॉलीबॉलमध्ये त्रिंबकची विजयी भरारी!

व्हॉलीबॉलमध्ये त्रिंबकची विजयी भरारी!

मालवण तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत तीन गटांत रंगला चुरशीचा सामना; त्रिंबक, टोपीवाला व कट्टा संघांची जिल्हास्तरासाठी निवड

आचरा -विवेक परब
दमदार सर्व्हिस, आक्रमक स्मॅश आणि प्रत्येक गुणासाठी रंगलेली चुरस… अशा उत्साहपूर्ण वातावरणात मालवण तालुकास्तरीय शालेय शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धांचा थरार जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या मैदानावर अनुभवायला मिळाला. तालुक्यातील सुमारे २० शाळांच्या संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले. तीन गटांतील विजेत्या संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.
मालवण तालुकास्तरीय शालेय शासकीय व्हॉलीबॉल स्पर्धा गुरुवारी (२ ऑक्टोबर) जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अन्ना सकपाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे कार्यवाह अरविंद घाडी, उपाध्यक्ष अशोक बागवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल प्रभू, संचालक डॉ. सुधीर मेहेंदळे, एकनाथ घाडीगांवकर, संजय सामंत, राजू त्रिंबककर, सच्चिदानंद भोगटे, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, क्रीडा समन्वयक संजय पेंडुरकर यांच्यासह मालवण तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुली, १४ वर्षांखालील मुलगे आणि १९ वर्षांखालील मुलगे अशा तीन गटांत सामने झाले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात जनता विद्या मंदिर, त्रिंबक संघाने प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात टोपीवाला हायस्कूल, मालवण संघ विजेता ठरला. तर १९ वर्षांखालील गटात इंग्लिश मीडियम स्कूल, कट्टा संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
या तिन्ही विजेत्या संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
स्पर्धेतील पंच म्हणून अमित हर्डीकर, महेंद्र वारंग, श्यामसुंदर वारंग, संतोष तावडे आणि निशिकांत पराडकर यांनी जबाबदारी पार पाडली. क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक, क्रीडा शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here