शिवसेनेचा भगवा जिल्हा–पंचायतीवर फडकवूया — वैभव नाईक
कुडाळ l पांडुशेठ साठम
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची कुडाळ येथे झालेल्या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक यांनी आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीचे आवाहन केले.
सत्ताधारी आमदार–खासदारांनी गेल्या वर्षभरात कुडाळ तालुक्याचा कोणताच विकास केला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. नाईक म्हणाले, “शाळा–हायस्कूल बंद करण्यापासून ते जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या पूर्ण अपयशापर्यंत सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा स्पष्ट आहे. कुडाळमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट असून आरोग्य सुविधा ढासळल्या आहेत. आम्ही सुरू केलेल्या मेडिकल कॉलेजमधूनही नागरिकांना योग्य सुविधा मिळत नाहीत. गोव्याला उपचारांसाठी जावे लागणे ही सत्ताधाऱ्यांची अपयशाची पावती आहे.”जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त शिवसेनेत असल्याचे नमूद करत त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले.
कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद मतदार संघ आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि पदाधिकारी यांची बैठक माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुकाप्रमुख पदी कृष्णा धुरी व कुडाळ तालुका संघटकपदी सचिन कदम यांची निवड झाल्याने शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुकासंपर्क प्रमुख अतुल बंगे, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगांवकर,अवधूत मालणकर, विभागप्रमुख दिपक आंगणे, मंगेश बांदेकर, बाळा कांदळकर, गंगाराम सडवेलकर, दत्ताराम उभारे , शैलेश विरनोडकर, राजेंद्र घाडीगावकर, नरेंद्र राणे, दशरथ मेस्त्री आदी उपस्थित होते.


