शेतकरी सन्मान योजनेत ६.५६ लाख शेतकऱ्यांना अद्याप लाभ नाही – बाबासाहेब पाटील
गुहागर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात जाहीर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र ठरलेले राज्यातील ६ लाख ५६ हजार शेतकरी अद्याप योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, अशी कबुली सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवार, ११ डिसेंबर रोजी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ५,९७५ कोटी ५१ लाख रुपये निधीची आवश्यकता असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी या योजनेबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
लेखी उत्तरानुसार, शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २०२२ मध्ये दिले होते, तरीही ६.५६ लाख शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नसल्याचे पाटील यांनी मान्य केले.
शेतकऱ्यांच्या थकित कर्जातून मुक्ती आणि शेती क्षेत्रातील सुधारणा घडवण्यासाठी, सरकारने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी उच्चाधिकार समिती गठीत केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.


