शेतजमिनीत विद्युत लाईनचे पोल उभारणीचे काम थांबवले – सोनुर्लीत ग्रामस्थांचा विरोध
सावंतवाडी
सोनुर्ली परिसरात ग्रामस्थांना पूर्वकल्पना न देता तसेच ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात काम न करण्यास सांगूनही वीज वितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून 11 केव्ही विद्युत लाईनसाठी पोल लावण्याचे काम सुरू करण्यात आले. शेतजमिनीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी आज हे काम रोखत तीव्र विरोध नोंदवला. “कॉरी क्रशरला लाभ मिळावा म्हणून आमच्या जमिनीचे नुकसान सहन करणार नाही,” अशा शब्दांत ग्रामस्थांनी ठाम इशारा दिला.
सोनुर्ली गावातून वेत्ये आणि इन्सुली भागात सुरू होणाऱ्या एका कोरी क्रशर प्रकल्पासाठी ही 11 केव्ही विद्युत लाईन प्रस्तावित आहे. या कामाला सुरुवातीपासूनच स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ विरोध करत आहेत. याचदरम्यान, मागील काही दिवसांत ठेकेदाराने वन विभागाची परवानगी न घेता काही झाडांची तोड केली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी त्यावेळीही या प्रकारावर नाराजी व्यक्त करत ठेकेदाराला इशारा दिला होता.
याशिवाय, ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीमार्फत वीज वितरण कंपनीला या कामाविरोधात लेखी सूचना देण्यात आली होती. कंपनीनेही ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आज अचानक कोणतीही माहिती न देता ठेकेदाराने शेतकऱ्यांच्या जमिनीत विद्युत पोल बसवण्यास सुरुवात केली.
ही बाब लक्षात येताच शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने त्या ठिकाणी दाखल झाले आणि काम तत्काळ थांबवले. उपसरपंच भरत गावकर यांनी घटनास्थळी पोलीस पाचारण केले. चौकशीदरम्यान ठेकेदाराने, “आम्हाला वीज वितरण कंपनीकडूनच हे काम करण्याचे आदेश आहेत,” असे सांगितले. तथापि, ग्रामस्थांनी शेतजमिनींचे नुकसान, तसेच गावाला या लाईनचा कोणताही प्रत्यक्ष फायदा नसल्याचे स्पष्ट करून कामास ठाम नकार दिला.
घटनास्थळी आलेल्या पोलिसांनीही ठेकेदाराला सूचित केले की, ग्रामस्थांना विश्वासात न घेता कोणतेही काम पुढे नेऊ नये आणि कोणत्याही वादाला तिलांजली देऊनच पुढील कार्यवाही करावी.


