श्रीवर्धन-दिवेआगर-आरावी-हरिहरेश्वर पर्यटन सर्किट विकसित करण्यावर भर

0
5
श्रीवर्धन-दिवेआगर-आरावी-हरिहरेश्वर पर्यटन सर्किट विकसित करण्यावर भर
श्रीवर्धन-दिवेआगर-आरावी-हरिहरेश्वर पर्यटन सर्किट विकसित करण्यावर भर

श्रीवर्धन-दिवेआगर-आरावी-हरिहरेश्वर पर्यटन सर्किट विकसित करण्यावर भर

आरावी समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण करणार

मुंबई :

भाऊचा धक्का ते दिवेआगर प्रस्तावित रो-रो सेवा, बागमांडला जेट्टी येथील वाहनतळ, कारविणे येथील श्रीकृष्ण जेट्टीची दुरुस्ती व जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, दिवेआगर जेट्टी, आरावी समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण तसेच मुळगाव बंधाऱ्यालगतच्या जमिनीची महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालकीबाबत मंत्रालयात बैठक झाली. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या.

आरावी समुद्रकिनारा गेल्या दीड ते दोन वर्षांत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला असून येथे पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि सुशोभीकरणाची कामे करणे गरजेचे असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी बैठकीत सांगितले.

पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेता समुद्रकिनारी अनधिकृत स्टॉल किंवा झोपड्या उभारल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन आरावी समुद्रकिनाऱ्याचा नियोजनबद्ध विकास करणे आवश्यक असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

श्रीवर्धन, दिवेआगर, आरावी आणि हरिहरेश्वर या परिसरातील पर्यटनस्थळांचा एकत्रित विकास करून पर्यटन सर्किट तयार करण्याच्या दृष्टीने विविध प्रस्तावांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. हरिहरेश्वर येथील प्रदक्षिणा मार्गाच्या विकासाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून, संबंधित कामांसाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याची कार्यवाही सुरू आहे.

आरावी समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करावी. तसेच प्रलंबित अडचणी दूर करून विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here