संविधान दिनी किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा
संविधान दिनी किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ सोहळा; ११ गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम
२६ नोव्हेंबरला हिरकणीवाडी येथे आयोजन; राज्यातील ११ गड-किल्ल्यांवर स्वच्छता अभियान आणि संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन
रायगड :
छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांचा संगम साधत संविधान दिनानिमित्त किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हिरकणीवाडी, किल्ले रायगड येथे हॉटेल साक्षीसमोर, रायगड रोपवे परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यांतर्गत गड-किल्ले स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृती अभियान, संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन व प्रतिज्ञा, पर्यावरण संवर्धनासाठी अभिवादन तसेच सांस्कृतिक आणि लोककला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून राज्यभरातील ११ गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. किल्ले रायगड येथे सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे.
ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा जपणे, संविधानातील मूल्यांचा प्रसार करणे आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या विशेष सोहळ्यात सहभागी होऊन स्वच्छता, संविधानाचा सन्मान आणि ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा संकल्प करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.