समाजातील विषमता दूर करणे हेच आपले उद्दिष्ट असावे : न्यायमूर्ती श्याम चांडक
सिंधुदुर्गनगरी :
समाजातील असमानतेची दरी पूर्णपणे दूर करणे कदाचित शक्य नसले, तरी ती अधिक खोल जाऊ न देणे आपल्या हातात आहे. गरजू व्यक्तींना आधार देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. समाजातील विषमता दूर करणे हेच आपले उद्दिष्ट असावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्गचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग आणि हेतु चॅरिटेबल ट्रस्ट, मालाड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित वस्तू वाटप शिबिरात ते बोलत होते. यावेळी गरजू विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना विविध आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फरहान दुबाश, न्यायमूर्ती अमित जामसंडेकर, माजी न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होते. माजी न्यायमूर्ती कमलकिशोर तातेड यांनी गरजू व्यक्तींना केवळ तात्पुरती मदत न करता त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
हेतु चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखब जैन यांनी ट्रस्ट गेल्या १५ वर्षांपासून दिव्यांग व आदिवासी बांधवांसाठी कार्यरत असून, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातूनही मदत केली जात असल्याची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय आणि विधीलेखा सदनच्या भूखंडांचे स्वतंत्र सातबारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सिंधुदुर्गनगरीतील महत्त्वाच्या आस्थापनांसाठी भूखंड नावावर करण्याचे काम पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिबिरात ६० हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, १५ महिलांना शिलाई मशीन आणि १५ दिव्यांगांना व्हीलचेअर व श्रवणयंत्र देण्यात आले. तसेच मेडिकल बेड, वॉशिंग मशीन, पंखे, एलईडी टीव्ही, इन्व्हर्टर, जनरेटर, पाण्याचे पंप आदी आवश्यक वस्तूंचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमाला मोहनलाल सायर चंद ट्रस्टचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे होते. यावेळी अॅड. संग्राम देसाई, अॅड. एस. ए. राणे, अॅड. परिमल नाईक, विकास कवाड आदी उपस्थित होते. शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या पूजनाने झाले.


