साताऱ्यात उद्यापासून ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मराठी साहित्याच्या भव्य पर्वाला प्रारंभ
सातारा l प्रतिनिधी
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्यापासून सातारा येथे भव्य प्रारंभ होत आहे. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत हे ऐतिहासिक साहित्य संमेलन शाहू स्टेडियम, सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामुळे सातारा शहर साहित्यप्रेमींनी गजबजून जाणार असून संपूर्ण शहर साहित्यसंमेलनमय झाले आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी विविध महत्त्वपूर्ण आणि आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ध्वजारोहण करून संमेलनाची अधिकृत सुरुवात होणार आहे. त्यानंतर ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींना विविध प्रकाशनांची पुस्तके पाहण्याची व खरेदीची संधी मिळणार आहे.
पहिल्याच दिवशी कविकट्टा, गझलकट्टा आणि प्रकाशन कट्टा या साहित्यिक मंचांवर नामवंत कवी, गझलकार आणि लेखक आपली साहित्यनिर्मिती रसिकांसमोर सादर करणार आहेत. तसेच साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार असून, त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला जाणार आहे.
संध्याकाळच्या सत्रात ‘बहुरूपी भारूड’ या लोककलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मराठी लोकसंस्कृतीचा रंगतदार आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.
शब्द, विचार आणि संस्कृतीचा मंगल प्रारंभ असलेल्या या संमेलनामुळे मराठी साहित्याच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या साहित्य पर्वासाठी राज्यभरातून तसेच देशविदेशातून साहित्यिक, अभ्यासक आणि रसिक साताऱ्यात दाखल होत आहेत.
“सातारा होतोय साहित्य संमेलनमय” या भावनेतून आयोजकांनी सर्व मराठी साहित्यप्रेमींना या ऐतिहासिक संमेलनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन केले आहे.


