सिंधुदुर्गच्या ‘आयएनएस गुलदार’ प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान

0
11
सिंधुदुर्गच्या ‘आयएनएस गुलदार’ प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान
सिंधुदुर्गच्या ‘आयएनएस गुलदार’ प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान

सिंधुदुर्गच्या ‘आयएनएस गुलदार’ प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील ‘गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान

सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महत्त्वाकांक्षी ‘आयएनएस गुलदार’ प्रकल्पाला प्रतिष्ठेचा ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प म्हणून विकसित होत असलेल्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या सागरी पर्यटन क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली असून, ही राज्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अभिनंदन केले.
‘द वीक’ मासिकाच्या वतीने आयोजित ‘द वीक हेरिटेज ॲवॉर्ड – गोल्डन बॅनियन ॲवॉर्ड २०२६’ या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन २७ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री संग्रहालय व ग्रंथालय येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी महामंडळाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक माने, अधीक्षक अभियंता संजय पाटील, ॲक्वाटिक टुरिझमच्या वरिष्ठ व्यवस्थापक क्षिप्रा बोरा, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आयएनएस गुलदार प्रकल्पाचे महत्त्व
सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटनाला नवे आयाम देण्याच्या दृष्टीने ‘आयएनएस गुलदार’ प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ निर्मिती आणि पाणबुडी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांना सागरी जैवविविधता व पाण्याखालील विश्वाचा अनुभव घेता येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here