सिंधुदुर्गच्या तन्वी पवार, गार्गी जुवेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड

0
9
सिंधुदुर्गच्या तन्वी पवार, गार्गी जुवेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड
सिंधुदुर्गच्या तन्वी पवार, गार्गी जुवेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड

सिंधुदुर्गच्या तन्वी पवार, गार्गी जुवेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड

कोकणच्या लेकींची मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात निवड; तन्वी पवार आणि गार्गी जुवेकर सुरतच्या मैदानावर चमकणार!

आचरा (विवेक परब) :
कोकणच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करत आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या दोन विद्यार्थिनींनी मुंबई विद्यापीठाच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. तन्वी पवार आणि गार्गी जुवेकर या दोन्ही खेळाडूंची पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय महिला क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील या खेळाडूंनी आपल्या मेहनतीच्या आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर मिळवलेल्या यशामुळे आचरा महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मनोज एन. रेड्डी यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे या निवडीची घोषणा केली. गुजरातमधील सुरत येथील प. पु. सावनी विद्यापीठात २३ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत तन्वी पवार आणि गार्गी जुवेकर मुंबई विद्यापीठाच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मुंबई विद्यापीठाचा संघ २१ नोव्हेंबर रोजी मुंबईहून सुरतकडे रवाना होणार आहे.
दोन्ही खेळाडूंना क्रिकेटचे कौशल्य विकसित करण्यासाठी विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी, मालवण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अकॅडमीचे प्रशिक्षक संदीप पेडणेकर, सुशील शेडगे आणि ज्ञानेश केळुसकर यांनी त्यांना सातत्यपूर्ण प्रशिक्षण दिले. कठोर सराव, जिद्द, मेहनत आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर या दोघींनी विद्यापीठाच्या संघात स्थान मिळवण्याचा बहुमान पटकावला.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर विद्यापीठाच्या संघापर्यंत मजल मारणे ही कोकणसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे आचरा महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली असून, परिसरातील नवोदित महिला क्रिकेटपटूंनाही प्रेरणा मिळाली आहे.
या यशाबद्दल आचरा पीपल्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप मिराशी, महाविद्यालयाचे चेअरमन संजय मिराशी, खजिनदार विद्यानंद परब आणि सचिव समीर बावकर यांनी दोन्ही खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नितेश सारंग, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही तन्वी पवार व गार्गी जुवेकर यांचे अभिनंदन केले.
कोकणच्या मातीतून मुंबई विद्यापीठाच्या संघापर्यंत झेप घेणाऱ्या या दोन्ही खेळाडू आता सुरतच्या मैदानावर आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here