सिंधुदुर्गात हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांना अनुदानावर यंत्रसामग्री

0
91
सिंधुदुर्गात हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांना अनुदानावर यंत्रसामग्री
सिंधुदुर्गात हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांना अनुदानावर यंत्रसामग्री

सिंधुदुर्गात हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांना अनुदानावर यंत्रसामग्री

तीन तालुक्यांना लाभ

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेअंतर्गत वैभववाडी, कणकवली व दोडामार्ग या तीन तालुक्यांतील हळद उत्पादक शेतकरी व महिला बचत गटांना अनुदानावर हळद भरणी व काढणी यंत्र पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी एक याप्रमाणे हळद प्रक्रिया युनिट देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात नुकतीच जिल्हास्तरीय खरेदी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित घटकांना हळद भरणी व काढणी यंत्र तसेच हळद प्रक्रिया युनिट देण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळद लागवड व प्रक्रिया योजना सन २०२५-२६ मध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांसाठी हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज (जिल्हा सांगली) येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना सांगली जिल्ह्यातील प्रगतीशील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन हळद लागवड व प्रक्रिया पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हळद पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच या पिकातून मिळणाऱ्या नफ्याची माहिती देण्यासाठी जिल्हा, तालुका व प्रभाग स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे हळद उत्पादक शेतकरी व महिला गटांमध्ये हळद लागवड व प्रक्रियेबाबत उत्साह वाढला आहे.

प्रशिक्षणादरम्यान हळद बियाणे निवड, लागवड पद्धती, एकात्मिक खत व कीड-रोग व्यवस्थापन, तसेच वाढणीनंतरची तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळद पिक लागवडीस मोठा वाव असून, या पिकासाठी कीड, रोग व देखभाल खर्च तुलनेने कमी आहे. त्यामुळे भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here